top of page

उस्ताद अल्लार खॉं

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 2 min read

Updated: Jan 29, 2021


अ} जन्म, बालपण, प्रारंभिक शिक्षण :- उस्ताद अल्लारखॉं साहेबांचा जन्म १९१५ साली पंजाबमधील रतनगढ जिल्ह्यातील गुरुदासपूर येथे झाला. त्यांचे वडील हशिम अली खॉं हे पेशाने शेतकरी होते आणि शेती वाडीची कामं करून ते उपजीविका करीत असत. पूर्वजन्मातील कलाक्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे की काय त्यांना उपजतच लयज्ञान होते. अगदी लहान वयातच त्यांनी नाटक कंपनीत नोकरी धरली व ते पठाणकोट येथे वयाच्या १५/१६ व्या वर्षांपासून राहू लागले. तेथेच पंजाब घराण्याचे उस्ताद कादिर बक्श खॉं यांचे शागीर्द उस्ताद लाल महम्मद खॉं यांचा गंडा त्यांनी बांधला. तसेच त्यांनी पंजाब, दिल्ली, मुंबई येथे आकाशवाणी केंद्रामध्ये काही वर्ष नोकरी केली. आकाशवाणीवरून त्यांचे अनेक एकलवादनाचे आणि साथीचे कार्यक्रम प्रसारित झाले.


ब} प्रगत शिक्षण आणि योगदान :- काही दिवसांनी लाहोरला आपल्या काकांबरोबर गेले असता तेथे त्यांनी उस्ताद कादिर बक्श खॉं यांचे तबला वादन ऐकले आणि भारावून जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले. अप्रतिम लयकारी आणि बुद्धी चातुर्य पणाला लावून त्यांनी अगणित रचना केल्या. उस्ताद अल्लारखॉं यांच्या हाताचे वजन दायाँ-बायाँ वर अतिशय प्रमाण बद्ध असून, लयकारी कल्पनातीत असे. साथ-संगत ते इतक्या कुशलतेने करत असत की उस्ताद अली अकबर खॉं, पंडित रवी शंकर, पंडित बिरजू महाराज यांसारखे सिद्धहस्त कलावंत त्यांनाच आपल्या साथीला नेहेमी घेत असत. तंतुवाद्याच्या साथ-संगतीबरोबरच नृत्याची साथही ते अतिशय योग्य , पूरक करीत असत. सुप्रसिद्ध नृत्यकार बिरजू महाराज यांचे अनेक कार्यक्रम त्यांच्या साथीमुळे गाजलेले आहेत. ते अतिशय उदार स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या आजुबाजुला चाहत्यांची नेहमीच गर्दी असे. ते उत्कृष्ट वादक, रचनाकार व गुरु होते. त्यांनी केलेल्या अनेक रचनांवरून त्यांच्या विद्वत्तेची, प्रतिभेची कल्पना येते. उस्ताद अल्लारखॉं साहेबांनी वेगळ्या लयींचे, विरामांचे, गणिती स्वरुपांचे, तिहायांचे चक्रदार, गती, तुकडे, परण, कायदे, रेले, चलन बनवले आहेत. त्यांनी विलंबित लयीतील पेशकारांमध्ये लघु-मात्रा, काल, विराम, जाती यांचा समावेश करून आपला स्वतंत्र विचार मांडला आणि स्वतंत्र तबला वादनात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. फक्त त्रितालातच नव्हे तर झपताल, रूपक, पंचम-सवारी अशा इतर तालातही ते अनेकदा एकल तबला वादन करीत असत. त्यांच्या प्रगल्भ बुध्दीमत्तेमुळे आणि संगीतातील ज्ञानामुळे त्यांनी काही वर्ष संगीतदिग्दर्शक म्हणूनही काम करून अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे.


क} सन्मान व पुरस्कार :- भारत सरकारने 'पदमश्री' पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.


ड} शिष्य :- त्यांनी अनेक शिष्य तयार केले असून त्यात त्यांचा मुलगा उस्ताद झाकीर हुसैन, उस्ताद फझल कुरेशी, उस्ताद तौफिक कुरेशी, पंडित योगेश समसी, श्री. आदित्य कल्याणपूर, श्रीम. अनुराधा पाल आदींचा समावेश आहे.


इ} मृत्यू :- या विख्यात तबला वादकाचे, ३ फेब्रुवारी २००० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Recent Posts

See All
उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब

अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब यांचा जन्म इ.स. १९१८ साली उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झाला. फरुखाबाद घराण्याचे...

 
 
 
उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

 
 
 
उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

 
 
 

Comments


bottom of page