top of page

उस्ताद अहमदजान थिरकवा खॉं

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 2 min read

Updated: Jan 29, 2021


अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद अहमदजान थिरकवा खॉं यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे इ.स. १८८१ साली झाला. त्यांचे आजोबा उस्ताद कलंदर बक्श हे एक नावाजलेले तबला वादक आणि रचनाकार होते. तसेच त्यांचे काका उस्ताद शेर खॉं हेही उत्तम तबला वादक आणि रचनाकार होते. त्यांचे वडील हुसेन बक्श हे सारंगी वादक होते त्यामुळे थिरकवा साहेबांना बालपणापासूनच संगीताचे, तबल्याचे बाळकडू मिळाले.


ब} प्रगत शिक्षण :- दहा अकरा वर्षांचे असताना त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजे मियाँ जानने त्यांना मेरठ जवळ ललियानास उस्ताद मुनीर खॉं यांच्याकडे तबला शिकण्यास नेले. तेव्हा मुनीर खॉं यांनी हात पाहण्यासाठी उस्ताद अहमदजान थिरकवा ना काही वाजविण्यास सांगितले. त्यावेळी खॉं साहेबांची बोटे एका विशिष्ट लयीत थिरकली आणि तेव्हापासून खॉं साहेबांना 'थिरकू' म्हणू लागले आणि पुढे थिरकूचा 'थिरकवा' झाला. उस्ताद मुनीर खॉं यांच्यामुळे त्यांना लखनौ, फरुखाबाद, दिल्ली व अजराडा या चार घराण्यांचा बाज मिळाला. उस्ताद मुनीर खॉं यांच्याकडे त्यांनी सुमारे २६ वर्षे विद्यार्जन केले.


क} वादन वैशिष्ट्ये :- थिरकवा यांनी थोड्याच काळात किर्ती संपादन केली. स्वतंत्र वादन ते अतिशय प्रभावीपणे करीत असत. थिरकवा साहेबांच्या वादनामध्ये गोडवा, गंभीरता, मुलायमपणा आणि जोरकसपणा यांचे मिश्रण अतिशय कल्पकतेने दिसून यायचे. साथ-संगतीमधेपण ते माहीर होते.


ड} योगदान :- रामपूरच्या नवाबांकडे ते बरीच वर्षे दरबारी वादक म्हणून आश्रयास होते. त्यांच्या तबला वादनावर आनंदित होऊनच नवाबांनी त्यांना अतिशय सन्मानाने आपल्या दरबारी ठेवून घेतले होते. तसेच नटसम्राट बालगंधर्व यांनी देखील आपल्या नाटक कंपनीत खॉं साहेबांना कायम ठवून घेतले होते. बालगंधर्वांचे गाणे व खॉं साहेबांचा तबला ऐकण्यासाठी लोक दुरून दुरून येत असत. अनवट कायदे तसेच गती वाजविण्यात ते अतिशय माहीर होते. मॅरीस कॉलेज, लखनौ येथे ते तबला प्राध्यापक होते. ते रोज १४ ते १५ तास कठोर रियाझ करीत असत. तसेच 'नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स', मुंबई येथेपण ते तबला प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.


इ} सन्मान व पुरस्कार :- तबला वादनात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारने, १९५३-५४ या वर्षासाठीचा 'राष्ट्रपती' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. त्यानंतर भारत सरकारने, १९७० साली त्यांना 'पद्मभूषण' या पुरस्काराने गौरविण्यात आले.


ई} मृत्यू :- थिरकवा खॉं साहेबांच्या दोन्ही इच्छा 'परवरदिगार'ने पूर्ण केल्या. एक म्हणजे आयुष्याच्या अंता पर्यंत माझा तबला चांगला वाजला जावा आणि दुसरी इच्छा म्हणजे अखेरचा श्वास मला लखनौमध्येच घेता यावा आणि १३ जानेवारी १९७६ रोजी तबल्याच्या या सूर्याचा अस्त लखनौमध्येच झाला.

Recent Posts

See All
उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब

अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब यांचा जन्म इ.स. १९१८ साली उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झाला. फरुखाबाद घराण्याचे...

 
 
 
उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

 
 
 
उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

 
 
 

Comments


bottom of page