top of page

तबल्याच्या उत्पत्तीबाबत विभिन्न मतप्रवाह

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 19, 2020
  • 3 min read

Updated: Jan 27, 2021


भारतीय संगीतात तालवाद्य म्हणून तबल्यास फार महत्वाचे स्थान आहे. तबला या वाद्याच्या निर्मितीसंबंधी भिन्न भिन्न मतप्रवाह आणि आख्यायिका आढळून येतात.

तबल्याच्या उत्पत्ती संदर्भात इतिहासाबरोबरच पौराणिक कथा व काल्पनिक तत्वांचा समावेश झालेला दिसून येतो. प्राचीन मंदिरे, गुहांमधील चित्रे, शिल्प व मूर्ती यावरील उल्लेखांचा आढावा घ्यावा लागेल.


१) मृदंग, पखवाजापासून तबल्याची निर्मिती - तबल्याच्या उत्पत्ती संदर्भात असा एक मतप्रवाह आहे की, दोन दिग्गज पखवाज वादकांची जुगलबंदी चालू होती. यापैकी एका पखवाज वादकाची हार झाली, तेव्हा त्याने रागाने पखवाजाचे दोन तुकडे केले, पण तरीसुद्धा त्या दोन तुकड्यांमधून नाद (आवाज) येत होता, म्हणजे 'तब भी बोला'! याचाच पुढे अपभ्रंश होऊन, 'तबला' या नावाची व वाद्याची निर्मिती झाली असावी.


२) मुघलांकडून तबल्याचे भारतात आगमन - प्रसिद्ध इतिहासकार इब्ज खुर्दाद बिहल यांच्या मते तबल्याची निर्मिती 'तबल बी लमक' या कलावंताने केली असावी असा एक प्रवाद आहे. महम्मद पैगंबराच्या विचारांचा पगडा अरेबियन देशावर पडत होता. त्या काळात इस्लाम संस्कृती प्रगती पथावर होती. त्यामुळे अनेक देशातील संस्कृतींचे आदान - प्रदान झाले. सिरिया व पर्शिया या दोन देशांनी संगीत कलेचा प्रचार व प्रसार केला. अरेबियात 'तबल जंग' नावाचे एक वाद्य प्रचलित होते. सिरियन भाषेत 'तबला' हा शब्द प्रचलित होता. अशाप्रकारे मेसापोटेनिअम, सीरियन व अरेबियन संस्कृतीतून 'तबला' हे वाद्य भारतात आले असावे.


३) संगीतास राजाश्रय - मुघल सम्राटांच्या काळात म्हणजेच सुमारे इ.स. १२६६ ते १३६६च्या दरम्यान संगीतास राजाश्रय होता. ठिकठिकाणाहून येणाऱ्या संगीत कलाकारांची नेहमी राज दरबारी कदर केली जात असे. याच काळात पर्शियन संगीत भारतात आले. पर्शियन संगीताबरोबर तबला हे वाद्य भारतात आले असावे, कारण तबला या नावाशी साधर्म्य असलेल्या 'तबल-बलागी', 'तबल-सामी', 'तबल-टर्की' अशा नावाच्या वाद्यांचा उल्लेख पर्शियन साहित्यात आढळून येतो.


४) चर्म वाद्यांच्या नावातील साधर्म्य - इतिहासातील विवरणावरून मुस्लिम राज दरबारात वाजविल्या जाणाऱ्या वाद्यांच्या अगोदर 'तबल' या शब्दाचा प्रयोग केलेला दिसून येतो.

उदा. 'तबल - नगारा', 'तबल - मार्क', 'तबल अल्पुसानम' अशा वाद्यांच्या नावांवरून तबल्याचा जन्म झाला असावा असेही मानले जाते.


५) तबला शब्दाचा उगम - काही विद्वानांच्या मतानुसार 'त' वरून 'ताल', 'ब' वरून 'बोल' व 'ल' वरून 'लय' यांचा समन्वय म्हणजेच 'तबला' होय.


६) घियासुद्दीन बल्कन काळ - पर्शियन इतिहासकार करम इमाम यांनी असे लिहून ठेवले आहे की, घियासुद्दीन बल्कन यांच्या दरबारातील कलावंत कव्वालीची साथ करण्यासाठी तबला व डग्गा या वाद्यांसारखी जोडी घ्यायचे. या वाद्यांचा आकार सध्या प्रचलित असलेल्या तबला व डग्ग्यासारखाच होता.

परंतु या वाद्यांवर शाई लावलेली नसायची.


७) संगीताचा सुवर्णकाळ - १२५२ ते १३२५ या कालावधीत अनेक संगीतप्रेमी सुलतान होऊन गेले. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारी असलेले संगीत तज्ज्ञ, 'अमीर खुसरौ' यांनी अनेक संगीत प्रकारांचा मिलाप घडवून आणला. या काळाला 'संगीताचे सुर्वणयुग' असे म्हणता येईल. पर्शियन, सुमेरियन, इराण / अफगाण यांचे प्रचलित संगीत भारतीय संगीताशी जोडण्याचे महत्वाचे कार्य अमीर खुसरौ यांनी केले. त्यांनी भारतीय संगीतामध्ये अनेक नवीन वाद्यांचा समावेश केला तर काही वाद्यांमध्ये सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी नवीन राग, ख्याल गायकीची निर्मितीसुद्धा केली. तसेच काही ठेक्यांचीही रचना केली. ख्यालाच्या साथीला योग्य असे ताल-ठेके वाजविण्यासाठी, 'तबला' या वाद्याची निर्मितीसुद्धा अमीर खुसरौ यांनी केली असावी असे मानले जाते.


त्या काळात शाई लावण्यात येणारी मृदंग व पखवाज ही दोनच वाद्ये प्रचलित होती. तबल्यास शाई लावणे, तबल्याचा नाद व स्वरांचा गुण वाढविणे, निरनिराळ्या स्वरांप्रमाणे 'तबल्याची निर्मिती' करणे, असे काही प्रयोग त्यांनी केले. मुघल शासनकर्त्यांनी आपल्या लेखात अमीर खुसरौ यांनाच 'तबल्याचे निर्माते' म्हणून संबोधले आहे व त्यांनीच तबल्याला आधुनिक रूप देऊन तबल्यामध्ये १५ ठेके निर्माण केले.


अमीर खुसरौ यांनी तबला बांधणीमध्ये केलेले महत्वाचे बदल -


> बकरीच्या पातळ चामड्यांचा पुडीसाठी उपयोग केला.

> किनारीवर १ सेंटीमीटर लांबीची पट्टी ठेवली, त्यालाच 'चाटी / किनार' असे म्हणतात.

> तबला - डग्गा या दोन्ही वाद्यांवर शाई लावण्यात आली.

> दोरी ऐवजी वादीचा वापर करण्यात आला.

> खुंटयांऐवजी / खिट्टयांऐवजी लाकडी गठ्ठे वापरले गेले.

> गठ्ठे ठोकण्यासाठी हातोडीचा वापर करण्यात आला.



८) सिद्धार खाँ ढाढी - हे दिल्लीचे उत्तम पखवाज वादक होते. त्यांच्याविषयी एक आख्यायिका आहे. दिल्ली शहरातील भगवानदास ( भवानीदास ) हे एक श्रेष्ठ पखवाज वादक होते. सिद्धार खाँ व भगवानदास या दोन्ही कलाकारांमध्ये नेहेमी पखवाज वादनाची स्पर्धा होत असे. या स्पर्धेमध्ये भगवानदास विजयी होऊन नेहेमी त्यांची सरशी होत असे आणि सिद्धार खाँ यांचा पराभव होई. या पराभवामुळे चिडून सिद्धार खाँ यांनी पखवाजाचे दोन तुकडे केले आणि त्या दोन तुकड्यांचे रुपांतर पुढे तबला-डग्गा या वाद्यात झाले. अशाप्रकारे काही जाणकार सिद्धार खाँ ढाढी यांना 'तबल्याचे जनक' मानतात.


९) 'बलाग' वाद्याचा उल्लेख - सुमेरियन आणि बाबिलोनियम वांङमयांमध्ये 'बलग' किंवा 'बलाग' या वाद्याचा उल्लेख आढळून येतो. 'बलाग' म्हणजे 'बल' म्हणजेच वाजविणे ह्या क्रियापदापासून 'बलाग' शब्द आला असावा. म्हणून 'तबला' हा शब्द सुद्धा 'बलाग' या शब्दापासून आला असावा.


१० ) 'त्रिपुष्कर' या वाद्याशी साधर्म्य - पंडित उमेश मोघे यांनी त्यांच्या 'देहली का तबला' या ग्रंथामध्ये 'त्रिपुष्कर' या वाद्यापासून तबला आणि मृदंग या वाद्यांची निर्मिती झाली असे म्हंटले आहे. या वाद्यातील 'ऊर्ध्वक' (दर्दर) आणि 'पणव' (आंकिक) ही वाद्य म्हणजेच आजचा अनुक्रमे 'तबला' आणि 'डग्गा' असे त्यांनी अत्यंत शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केले आहे.


अशाप्रकारे 'तबला' निर्मितीबाबत अनेक मतप्रवाह, आख्यायिका व शक्यता संशोधकांना, अभ्यासकांना 'तबल्याचा अभ्यास' करताना दिसून आल्या आहेत.

अनेक वाद-विवाद, मतप्रवाह, आख्यायिका तसेच पुराव्यांअभावी, तबल्याची निर्मिती केव्हा, कशी, कोठे झाली व कोणी केली हे सांगणे कठीण जाते.

Recent Posts

See All
सांगता

अशाप्रकारे सध्याच्या काळात 'तबला' या वाद्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य...

 
 
 
तबल्याचे आधुनिक परिवर्तन

१) पूर्वी तबल्यासाठी एकाच जाड चामड्याचा वापर केला जात होता. परंतु पुढे एका जाड चामड्याऐवजी दोन पातळ चामड्याचा वापर करण्यात येऊ लागला....

 
 
 

Comments


bottom of page