top of page

भारतीय संगीतात तबल्याची भूमिका

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 19, 2020
  • 2 min read

Updated: Jan 29, 2021


तबला हे मुळात दोन भांड्यांनी बनविलेले वाद्य आहे. यातील डग्ग्यातून 'खर्ज' तर तबल्यातून 'तार' ध्वनी निर्माण होतात. परंतु तबल्याच्या तोंडाच्या व्यासानुसार त्यातून पखवाजाचा धीर-गंभीर आवाज तर ढोलकीचा टिपेचा आवाज देखील काढता येतो. डग्ग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे तबल्याच्या बोलांना 'गोलाई' प्राप्त होते आणि तबला ह्या वाद्यातून विविध बंद-खुल्या नादांची निर्मिती होते. तबला वाद्याच्या या गुणधर्मामुळेच लोकसंगीत, कव्वाली, ठुमरी, गझल, शास्त्रीय-उपशास्त्रीय, नाट्य, वाद्य संगीत, कत्थक नृत्य इतकेच नव्हे तर हल्लीच्या काळी प्रसिद्ध होत असलेले फ्यूजन संगीत या सर्व प्रकारच्या संगीतामध्ये 'तबला' या वाद्याची प्रमुख भूमिका असते.


१) शास्त्रीय संगीतात तबल्याची भूमिका - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल गायन होय. वास्तविक पाहता, ख्याल गायनामुळेच तबला या वाद्याची निर्मिती व विकास झाला. ख्यालाला आवश्यक असलेली, तालाची नादमय चौकट ठेक्याच्या माध्यमातून तबला या वाद्यामुळेच शक्य झाली आहे. आणि या ठेक्याच्या चौकटीत ख्यालाचा आनंद घेतानाच तबला वादकांना स्वतंत्र तबला वादनाचे रहस्य उलगडले. धृपद-धमार गायन हे पुरुषप्रधान गायन आहे. अर्थातच त्याच्याबरोबर पखवाजाची साथ योग्य ठरते. परंतु ख्याल गायन हे स्त्री व पुरुष दोन्ही कलाकार सारख्याच ताकदीने सादर करू शकतात. स्त्री कलाकारांबरोबरचे मधल्या स्वरातले तबले, उदा. काळी ४, काळी ५ असे सहज तयार करता येतात. त्यामुळे ख्याल गायन, शास्त्रीय संगीत यामधे तबल्याची भूमिका खूप महत्वाची ठरते.


२) उपशास्त्रीय, सुगम, नाट्य संगीतात तबल्याची भूमिका - हे सर्व संगीत-प्रकार प्रामुख्याने शब्द-प्रधान असतात. स्वरांइतके शब्दांना व त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांनाही तितकेच महत्व या सर्व संगीत-प्रकारांमध्ये असते. तबला या वाद्याच्या आणि खास करून डग्ग्यामुळे बोलांना आलेल्या गोलाईच्या गुणधर्मामुळे या वाद्यातून नाजूक व नादमय नादांची निर्मिती होऊ शकते. तबला हे वाद्य बोटांनी वाजविले जात असल्यामुळे त्याच्या बोलांमध्ये चंचलता, गतिमानता आणि आवश्यकतेनुसार मृदू-कठोरता आणता येते. या सर्व गोष्टी उपशास्त्रीय, सुगम आणि नाट्यसंगीताला अतिशय पोषक असतात. त्यामुळे या सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये 'तबला' या वाद्याची भूमिका महत्वाची असते.


३) वाद्य संगीत - वाद्य संगीतात सतार, सरोद, संतूर, बासरी, सारंगी इ. वाद्यांवर शास्त्रीय संगीत प्रस्तुत केले जाते. या वाद्यांचे प्रस्तुतीकरण गायकी अंग व तंतकारी अंग, या अंगांनी केले जाते. यापैकी गायकी अंगाने साथ करताना ती ख्यालाप्रमाणेच करायची असते. तंतकारी अंगामध्ये, विविध लयकारी, छंद, तिहाया आणि तयारी या अंगांनी रागाचा विस्तार होतो. या सर्वच अंगांना साथीसाठी 'तबला' हेच वाद्य पोषक ठरते. 'झाला' हा गतिमान-प्रकार, जो वाद्य संगीतावर वाजविला जातो, तो केवळ तबल्याच्या साथीनेच रंगू शकतो. त्यामुळे या सर्वच वाद्य-प्रकारांच्या साथ-संगतीमध्ये 'तबला' या वाद्याची भूमिका महत्वाची ठरते.


४) कत्थक नृत्य - उत्तर भारतीय नृत्य प्रकारांमध्ये कत्थक नृत्य ही प्राचीन नृत्यकला आहे. जोपर्यंत या कलेचे स्वरूप मंदिरापर्यंतच मर्यादित होते, तोपर्यंत पखवाजाची साथ पोषक होती. पुढे मुस्लिम राजवटीत ही नृत्यकला बादशहाच्या मनोरंजनासाठी सादर होऊ लागली.शृंगारिकता, गतिमानता आणि चंचलता या गोष्टींचाही प्रभाव या नृत्य-शैलीवर पडू लागला. त्यामुळे पखवाजाची साथ या नृत्य-शैलीस अपुरी पडू लागली. या उलट तबल्याची साथ मात्र कत्थक नृत्याला पोषक ठरू लागली. पुढे या नृत्य-शैलीमध्ये लयकारी, गतिमान-तत्कार आणि तबल्याबरोबर जुगलबंदी असे प्रकारही सादर होऊ लागले आणि ते अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. या सर्वच कारणांमुळे 'तबला' या वाद्याची, कत्थक नृत्यातील भूमिका अतिशय महत्वाची ठरते.


५) तबला-तरंग - विविध स्वरांचे तबले एकत्रित आणून, 'तबला-तरंग' बनविले जाते. पूर्वीपासूनच चित्रपट गीतांमध्ये तबला तरंग वाजवले जाते. हल्ली 'तबला-तरंग' यावर विविध गाणी वाजविण्याचे प्रयोगही केले जात आहेत.

Recent Posts

See All
वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

 
 
 
ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

 
 
 
उपशास्त्रीय संगीताची साथसंगत -

१) सशक्त व नाजूक अशा दोन्ही प्रकारे वाजविण्याची क्षमता २) ठुमरी, गज़ल, नाट्यगीत, भजन, टप्पा इ. प्रकारांची आणि त्यासोबत वाजल्या जाणाऱ्या...

 
 
 

Comments


bottom of page