top of page

व्याख्या - कायदा, रेला, पलटा, तिहाई, मुखडा, लग्गी, उठाण, चक्रदार, मोहरा

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Dec 14, 2020
  • 2 min read

Updated: Dec 18, 2023


१} कायदा :- तालाच्या खाली-भरीला अनुसरून असणाऱ्या व्यंजनप्रधान शब्द व त्यास स्वरमय अंत्यपद असणाऱ्या, सर्वसाधारणपणे मध्य किंवा द्रुत लयीत वाजणाऱ्या खंडबद्ध आणि विस्तारक्षम रचनेस 'कायदा' असे म्हणतात.

कायदा म्हणजे नियम. नियमांमध्ये बांधलेली रचना म्हणजे 'कायदा'.

तालाचे स्वरूप कायम ठेऊन, बोल समूहांची केलेली नियमबद्ध रचना म्हणजे 'कायदा'.

कायद्याचे अनेक पलटे / प्रकार होतात व कायदा 'तिहाईने' संपवितात. विस्तार करताना कायद्यातील बोलांचाच आधार घेऊन विस्तार केला जातो. कायद्याचे प्रस्तुतीकरण सर्वसाधारणपणे मध्य किंवा द्रुत लयीत केले जाते.


२} रेला :- 'रेला' या शब्दाचा अर्थ 'प्रवाह' असा आहे.

ज्या रचनेमधील बोल शीघ्र ( द्रुत ) गतीने वाजू शकतात, अंत्यपद सर्वसाधारणपणे व्यंजनात्मक असते, जी रचना विस्तारक्षम असून, तालाला अनुसरून खाली-भरी युक्त अशी असते, त्या रचनेला 'रेला' असे म्हणतात.

'रेला' म्हणजे छोट्या बोल समूहांची केलेली अशी रचना जी चौपटीत वा आठपटीतही अतिशय तयारीने वाजविता येते.

अतिशय द्रुत लयीत वाजणारा, प्रत्येक बोलाची अखेर व प्रारंभ एकमेकात गुंफले गेल्यामुळे 'रव' निर्माण करणारा प्रकार म्हणजे 'रेला' होय.


३} पलटा :- कायद्यातील शब्दांना उलट-सुलट करून, स्वरमय अंतिम शब्द तसाच ठेवून तयार होणाऱ्या खाली-भरी युक्त रचनेस 'पलटा' असे म्हणतात.


४} तिहाई :- सर्वसाधारणपणे 'धा' ने संपणारा बोलसमूह समान अंतराने तीन वेळा वाजवून जेव्हा शेवटचा 'धा' समेवर येतो, तेव्हा त्या रचनेस 'तिहाई' असे म्हणतात.

तिहाईतील विरामामुळे तिहाईचे 'दमदार तिहाई व बेदम तिहाई' असे दोन प्रकार होतात.


५} मुखडा :- समेपासून किंवा समेनंतर सुरवात करून पुन्हा समेवर येऊन पडणाऱ्या आकर्षक रचनेस 'मुखडा' असे म्हणतात.


६} लग्गी :- साधारणपणे दादरा, केहरवा आणि रूपक या तालांच्या दुपटीत किंवा चौपटीत वाजल्या जाणाऱ्या आकर्षक रचनांना 'लग्गी' असे म्हणतात.

लग्गीचा कायद्याप्रमाणे विस्तार करता येतो.


७} उठाण :- बनारस घराण्यामध्ये स्वतंत्र तबला वादनात सुरवातीला वाजल्या जाणाऱ्या जोरकस, आकर्षक, उत्स्फुर्त आणि तिहाईदार रचनेस 'उठाण' असे म्हणतात.

कत्थक नृत्याच्या आरंभीदेखील उठाण वाजविली जाते.


८} चक्रदार :- चक्रदार हा तिहाईचाच एक प्रकार आहे. एक छोटा बोलसमूह आणि त्याला जोडून तिहाई अशी रचना समान अंतराने तीन वेळा वाजवून शेवटचा 'धा' समेवर येतो तेव्हा त्या रचनेस 'चक्रदार' असे म्हणतात.

चक्रदाराचे, साधा चक्रदार, फर्माईशी चक्रदार, कमाली चक्रदार, चक्रदार-परण असे विविध प्रकार आहेत.


९} मोहरा :- समेवर येण्यासाठी वाजविली जाणारी, मुखड्या प्रमाणेच छोटीशी, एक सुंदर व आकर्षक असणारी रचना म्हणजे 'मोहरा' होय.

मोहरा व मुखडा ह्या दोन्ही रचनांमध्ये विशेष फरक नसतो. मोहरांचा उपयोग स्वतंत्र वादनात-खास करून समेवर येण्यासाठी होतो.


Recent Posts

See All
व्याख्या - मात्रा, ताल, सम, टाळी, खाली/काल, विभाग/खंड, दुगुन/दुप्पट, आवर्तन

१) मात्रा - ताल मोजण्याच्या परिमाणास 'मात्रा' असे म्हणातात. २) ताल - संगीतामध्ये काल मोजण्याच्या परिमाणास 'ताल' असे म्हणतात. गायन, वादन...

 
 
 
व्याख्या-आमद, त्रिपल्ली, चलन, कमाली-चक्रदार, चक्रदार, गत-कायदा, परण, पेशकार, नौहक्का, रौ,बाँट,लय

१) आमद - आमद म्हणजे नृत्याची साथ करताना तबल्यावर अथवा पखवाजावर प्रारंभी जी सुंदर व आकर्षक बोलरचना वाजविली जाते, त्यास 'आमद' किंवा 'सलामी'...

 
 
 

Comments


bottom of page