लोकसंगीतातील प्रमुख घन वाद्ये
- Team TabBhiBola

- Oct 19, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
१) झांज - झांज ही पितळ, तांबे किंवा कांस्य या धातूंपासून बनवितात. झांजेचे दोन समान भाग असतात. झांजेच्या मध्यभागी एक छिद्र असून, त्याला मूठ लावली जाते किंवा दोन्ही भाग एका दोरीने बांधले जातात. एका भागावर दुसऱ्या भागाचा आघात करून नादयुक्त वादन होते. या वाद्याचा उपयोग लय दाखविण्यासाठी होतो. आरत्या, अभंग, भक्तिगीते, भावगीते, भजन, चित्रपटगीते, लावणी या सर्व प्रकारच्या संगीतामध्ये झांजेचा वापर मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.
२) चिपळ्या - दोन लाकडी पट्ट्यांच्या आत पितळ्यांच्या गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात, अशा वाद्याला 'चिपळ्या' म्हणतात. ह्या पट्ट्यांची लांबी अंदाजे ५ ते ६ इंच असते. दोन्ही भागांना एक कान अथवा कडे असते. दोन्ही पट्ट्या एकमेकींवर आघात करून, नादमय आवाजाची निर्मिती केली जाते. कीर्तन, भजन, अभंग अशा भक्तिमय गीतांमध्ये चिपळ्यांचा वापर होतो.
३) घंटा - पितळ, तांबे अशा धातूंपासून घंटा बनवितात. घंटा गोलाकार असून, मध्यभागी एक लोलक लोंबकळत अडकवलेला असतो. त्याचा आघात मूळ घंटेच्या आतील पृष्ठभागी झाल्यावर नाद निर्मिती होते. लय निर्मिती लोलकाच्या हालचालीवर अवलंबून असते. देवळातील आरतीच्या वेळेस घंटानाद मोठ्या प्रमाणावर केला जातो. चर्च, शाळा, रेल्वे स्टेशन इ. ठिकाणीही वेगवेगळ्या आकाराच्या व नादाच्या घंटा आढळून येतात.
४) घुंगरू - पितळ्याच्या पत्र्यापासून घुंगरू बनविले जातात. पत्र्याला गोलाकार आकार देऊन त्यात लहान धातूच्या गोट्या घालतात. त्या गोट्यांच्या हालचालींवर नादनिर्मिती अवलंबून असते. शास्त्रीय नृत्य, लावणी तसेच कोळीगीतांच्या साथीसाठी याचा वापर केला जातो. हल्ली सुगम संगीत तसेच चित्रपट संगीतातही घुंगरांचा वापर निरनिराळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

Comments