पखवाज/पखावज -
- Team TabBhiBola

- Dec 17, 2023
- 1 min read
भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात मिळतो. पुरातन काळात मृदुंग या वाद्याला पुष्कर वाद्याच्या श्रेणीत प्रथम स्थान होते. मृदुंग, मुरज व मर्दल इ. नावांनी पखवाज हे वाद्य ओळखले जाते. मृदुंग या वाद्याचा प्रचार दक्षिण भारतात दिसून येतो. तिथे या वाद्याला ‘मृदंगम’ असे म्हंटले जाते. काही काळानंतर उत्तर भारतातील संगीत तज्ज्ञांनी मृदुंगाशी मिळत्या-जुळत्या आकाराचे वाद्य बनवून त्याचे नाव ‘पखवाज’ ठेवले. पखवाजावर अनेक कठीण ताल वाजविले जातात.
उदा. ब्रह्मताल, रुद्रताल, चौताल, लक्ष्मीताल इ.
तबल्याचा जन्म पखवाजातूनच झाला असावा असे मानले जाते.
पखवाजाची रचना – पखवाज हे खैर, शिसम वा बाभूळ या झाडांच्या बुंध्यांपासून बनवितात. ते दोन्ही बाजूंनी पोकळ असते. त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस बकरीची कमावलेली कातडी लावतात. वादीच्या सहाय्याने पुडी घट्ट ताण देऊन बसवितात. चार गट्ठे पुडीवर ताण देण्यासाठी बसवितात. वादी ही म्हशीच्या कातडीपासून बनवलेली असते. तिची ऊंची १ सें. मी. व लांबी २० मी. असते. उजव्या पुडीवर शाईचा लेप घोटून घोटून चढवितात. शाई ही लोखंडाचा कीस, खळ व कोळश्याची पूड यांच्या मिश्रणापासून बनविली जाते. डाव्या बाजूस वादन सुरू करण्यापूर्वी गव्हाच्या पिठाचा / कणकेचा लेप दिला जातो. त्यामुळे पखवाज घुमतो व वादन संपताच लेप काढला जातो. पखवाजाचा स्वर काळी २ वा पांढरी ४ असतो. उजव्या हाताच्या बोटांनी व डाव्या हाताच्या पंजाने जोरकस व खुले वादन केले जाते.
पखवाज या वाद्यावर धमार, चौताल, सूलताल, तेवरा इ. तालांचे वादन केले जाते तर ध्रुपद-धमार गायकी, अभंग, भक्तीगीत, कीर्तन, भजन व नृत्याच्या साथीसाठी पखवाज हे वाद्य सर्रास वापरले जाते.
पखवाज वादकांमध्ये कोउद सिंह, नाना साहेब पानसे, पर्वत सिंह, गुरुदेव पटवर्धन, राम शंकर, पागलदास, राजा छत्रपती सिंह, अर्जुन शेजवळ, भवानी शंकर इ. श्रेष्ठ कलावंतांचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Comments