तबला वादनातील उपजअंग व त्याचे महत्व
- Team TabBhiBola

- Dec 13, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
उपज हा शब्द 'उपजणे' म्हणजेच निर्माण होणे, यावरून तयार झाला आहे.
संगीतातील निर्मिती ही दोन प्रकारची असते.
१) संगीतामध्ये विविध कलाकार राग, बंदिशी तसेच ताल व तालातील विविध रचना यांची निर्मिती करत असतात. या प्रकारची निर्मिती सादरीकरणपूर्व अशा स्वरूपाची असते. ती अधिकाधिक बांधेसूद किंवा आखीव-रेखीव होण्याकडे निर्मितीकाराचा कल असतो. एखाद्या रागातील बंदिशी, एखादा कायदा किंवा एखादा गत-तुकडा, जेव्हा मंचावरून प्रथमच सादर केला जातो तेव्हा तो श्रोत्यांसाठी जरी नवीन असला तरी त्याचा निर्मितीकार, पेश करणारा कलाकार त्या रचनेशी पूर्णतः परिचित असतो. त्यामुळे अशा रचनेतही बांधेसूदपणा जाणवतो.
२) संगीतातील दुसऱ्या प्रकारची निर्मिती ही उत्स्फूर्त प्रकारची असते. ही निर्मिती पूर्ण रचनाप्रकाराची नसून, रचनेतील एखाद्या जागेपुरती मर्यादित स्वरूपाची असते. ही निर्मिती उत्स्फूर्तपणे तयार होणारी नादाकृती, लयकारी, स्वराकृती, हरकत, छंद, शब्दबंध (फ्रेझ) अशा स्वरूपाची असते. या निर्मितीशी केवळ श्रोताच नव्हे तर सादर करणारा कलाकारही अपरिचित असतो. आकाशात वीज चमकावी त्याप्रमाणे ही निर्मिती क्षणकाळाची असते. परंतु विजेप्रमाणेच ती सर्वांना दिपवून टाकते. अशा ह्या उत्स्फूर्त परंतु कलात्मक अशा निर्मितीस ''उपज'' असे म्हणतात.
तबल्याच्या संदर्भात स्वतंत्र तबला वादन हे, विस्तारक्षम रचना आणि अविस्तारक्षम रचना अशा दोन प्रकारांच्या रचनांमध्ये विभागलेले असते. यापैकी पूर्ण संकल्पित रचनांमध्ये 'उपज' क्रियेला विशेष स्थान नाही. किंबहुना त्या ठिकाणी 'उपज' अपेक्षितही नाही. अर्थात प्रतिभावान कलाकार अशा गत-तुकड्यांच्या रचनांमध्ये देखील नाद, विविधता किंवा तिहाईच्या गणितातील बदल, समेवर येऊन पडणारी आमद इ. मध्ये 'उपज' करतात, परंतु ही उपज फारच मर्यादित स्वरूपाची असते.
स्वतंत्र तबला वादकांची प्रतिभा ही विस्तारक्षम रचनांमध्ये आणि त्यातही खास करून 'पेशकारामध्ये' अनुभवास मिळते.

Comments