top of page

तबला वादनाचे तंत्र - हस्तसाधना, रियाज व निकास

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 19, 2020
  • 2 min read

Updated: Jan 29, 2021


भारतीय संगीतातील एक कष्टसाध्य वाद्य म्हणजे तबला होय. तबल्याच्या रियाजासंदर्भात अनेक बुजुर्गांनी अतिशय मोलाची माहिती आजपर्यंत लिखित अथवा मौखिक स्वरुपात ठेवली आहे. तबला हे तालवाद्य असल्यामुळे, स्वतंत्र वादन तर आहेच पण शास्त्रीय-उपशास्त्रीय तसेच सुगम संगीतातही तबला या वाद्याची आवश्यकता आणि उपयोगिता खूप असल्याने तबला वादकांच्या अभ्यासाची व्याप्ती खूपच मोठी आहे. पर्यायाने तबल्यातील या सर्व बाजू म्हणजेच स्वतंत्र वादन व विविध प्रकारांची साथ-संगत, यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी डोळस व अभ्यासू रियाजाची गरज आहे.


प्रथमतः रियाज म्हणजे काय ते पाहू -


रियाज ही संकल्पना बऱ्याचवेळा खूप वर्षे (गुरुंकडून) शिक्षण घेऊनही नीट समजलेली नसते, असे खूपदा जाणवते. रियाज म्हणजेच "विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन (गुरुंच्या) योग्य मार्गदर्शनाच्या आधारे, होकारात्मक दृष्टिकोनासहित, उद्देशाच्या पूर्तीसाठी केलेल्या अविश्रांत मेहनतीची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया" होय. संगीतातील ताल हा एक महत्वाचा घटक आहे आणि तबला हे तालवाद्य असल्यामुळे संगीतातील प्रत्येक प्रकारच्या तालविषयक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी तबल्याची, जेणेकरुन तबला वादकांची असते. या सर्व गोष्टींसाठी, योग्य मार्गदर्शन व सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मेहनत करणे अतिशय गरजेचे आहे. रियाज हा विषय अत्यंत मोठा असल्याने विषय समजण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे भाग पाडल्यास हा विषय समजून घेणे सुकर होईल.


रियाजासंदर्भातील आणखी काही मुद्दे खालील प्रमाणे-


१) क्रियात्मक रियाज सर्वसाधारणपणे पहाटेच्या वेळी करावा. एकतर पहाटेची वेळ प्रसन्न असते तसेच रात्रभराच्या विश्रांतीमुळे शरीरात शक्तीचा संचय झालेला असतो. यामुळे दिवसाच्या इतर प्रहारांच्या तुलनेत आपली कमी दमछाक होते व त्याचा परिणाम म्हणून आपण आपल्या जास्तीत जास्त क्षमता रियाजासाठी वापरू शकतो.


२) मोठ्या तोंडाचा व जाड शाई चा तबला रियाजासाठी अतिशय उत्तम.


३) एखादा बोल वाजविण्यास सुरू केल्यावर तो विलंबित लयीत किमान २० ते २५ मिनिटे वाजवावा. त्यानंतर लय वाढवत नेऊन आपल्या प्रगतीचा नेमका अंदाज घ्यावा.


४) दोन कायदे-रेले यांच्या मध्ये गत-तोड्यांसारख्या बंदिशींचा रियाज करावा. या पद्धतीमुळे पहिल्या कायद्याच्या रियाजाचा बोटांवर आलेला ताण कमी होतो, व दुसऱ्या कायद्या-रेल्या साठी हात ताजा-तवाना होतो.


५) निकास व्यवस्थित होऊ लागल्याबर तबला-डग्ग्यावर चादर टाकून रियाज करावा. यामुळे शरीरातील ताकदीचा अनावश्यक ऱ्हास होणे टळते. काही जण मनगटात लोखंडी कडी घालून रियाज करतात, पण यामुळे मनगटातील नसांवर तसेच बोटांवर अतिरिक्त ताण येतो की जो बऱ्याचवेळा वेगाला मारक ठरतो.


६) वेळ मिळेल त्यावेळी ४-५ तास रियाज करण्यापेक्षा रोज २-३ तास रियाज असला तरीही चालेल, पण तो मनाने एखादे व्रत केल्याप्रमाणे झाला पाहिजे.


७) सर्वसाधारणपणे हातांचे दोन प्रकार आढळतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे हात वजनदार असणे व दुसरा प्रकार म्हणजे हात वेगवान असणे. त्यामुळे आपल्या हाताला नेमकी वेगाची आवश्यकता आहे की वजनाची याचा विचार करुन रियाज करावा. सर्वांसाठी रियाजाची सरसकट एकच पद्धत असत नाही. स्वतःच्या दोषांकडे तटस्थपणे पाहून, ते दोष काढण्यासाठी गुरुंच्या मार्गदर्शनाखाली योग्य गोष्टींचा योग्य प्रकारे रियाज करावा.


८) हाताला असणारे वजन व बोल रचनेस असणारे वजन या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. खूप जणांना ताकद लावून वाजविणे म्हणजे वजनदार तबला वाजविणे असे वाटते पण हा गैरसमज आहे. तबल्यातील नादांनाही एक प्रकारचे सौंदर्य आहे, जे केवळ ताकदीच्या आधारावर कधीच कमविता येत नाही.


९) पढंतचा रियाज दररोज १५ ते २० मिनटे आवश्यकच असतो. वाणी जेवढी सुस्पष्ट तेवढे वादन स्वच्छ.


१०) रियाज केवळ परीक्षेसाठी, अर्थार्जनासाठी न होता, ज्ञानलालसेपोटी झाला पाहिजे, की ज्याचा उपयोग चिरंतन होतो.

Recent Posts

See All
पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

 
 
 
पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

 
 
 

Comments


bottom of page