बनारस घराणे

Updated: Jan 29, 2021
५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी उस्ताद मोदू खॉं यांच्याकडून बारा वर्षे शिक्षण घेतले व त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची अशी एक वेगळी शैली निर्माण केली. तेच बनारस घराणे होय.
बनारस वादन वैशिष्ट्ये :- लखनौ चे शागीर्द घराणे असल्याने खुल्या बाजातील सर्व गोष्टी या बाजामध्ये आहेतच, पण बंद बाजातील कायदे, रेले यांचाही समावेश या घराण्यात झालेला दिसून येतो. या घराण्याचे स्वतःचे असे जास्त कायदे नसले तरी दिल्लीचे बरेचसे कायदे या बाजामध्ये वाजविले जातात. पण निकास व विस्तार संदर्भातील विचारधारा दिल्ली पेक्षा वेगळी असल्याचे दिसून येते. या वादनशैलीवर पखवाज वादनशैलीचा प्रभाव आहे. ठुमरी-गायन प्रकाराची साथ करताना लग्गी-लडी यांचे खास वैशिष्टय मानले जाते. लव व शाईवर खूप काम केले जाते. दुर्गा परण, काली परण, रसलीला परण, कृष्ण परण या रचनांचे खास वादन या घराण्यात केले जाते. बनारस घराण्याच्या वादनशैलीत 'अनामिका' थोडी वाकडी करून प्रहार केला जातो. लवेत आघात करून वाजवण्याचा प्रयोग जास्त केला जातो. गत,परण, मोहरे, मुखडे, रेले, लग्गी, बॉंट, लडी इ.चा समावेश स्वतंत्र तबला वादनात व साथ संगतीसाठी केला जातो. फरद गत ही बनारस घराण्याची विशेषता मानली जाते. तसेच जनानी गत, मर्दानी गत खूप प्रसिद्ध आहेत.
बनारस घराण्याचे कायदे सरळ, सोपे व वेग वाढवण्यासाठी सुलभ असतात. वेगवान वादनाला प्राधान्य दिले जाते. स्वतंत्र वादनाची सुरुवात उठाण वाजवून केली जाते. व पेशकार ऐवजी ठेक्याचा विस्तार केला जातो. स्वतंत्र वादनासाठी टिपेचा तबला वापरतात. या बाजात वाजणारा पेशकार हा लग्गीवर आधारित असतो. बनारस घराण्यात वाजवला जाणारा 'बाँट' हा प्रकारही अतिशय सौंदर्यपूर्ण असतो.
तबलावादन करताना विरासन घालण्याची प्रथा आहे. तबला व डग्ग्याची बैठक विशिष्ट प्रकारची असते. तबला व डग्गा स्वतःच्या विरुद्ध बाजूस कलता ठेवतात. डग्गा वाजविताना शाई स्वतःकडे व मैदानाचा भाग श्रोत्यांकडे राहील अशी एक निराळी बैठक असते. हाताच्या संपूर्ण पंजाचा उपयोग करून 'धिर धिर' वाजविले जाते. धिन धिना, धेटे तेटे, केके नक, नग नग, कता कता, गदिगन, धिरधिर किटतक, तूंना किटतक, चाटेवरील तक तक इ. बोलांचा जास्त वापर केला जातो.
तबल्यावर फक्त तर्जनीचा वापर करून तीनतालाच ठेका अतिद्रुत लयीत वाजविण्याचे कसब या घराण्यातील वादकांनी आत्मसात केले आहे. गुरुंनी शिकवलेली रचना प्रामाणिकपणे, विश्वासाने, अतिशय कष्टाने जशीच्या तशी आत्मसात करून वाजविण्याचा प्रयत्न या घराण्यातील शिष्य, कलाकार करतात.
शिष्य परिवार आणि कलाकार :- पं. अनोखेलाल, पं. कंठे महाराज, पं. किशन महाराज, पं. सामता प्रसाद, पं. शारदा सहाय, पं. कुमार बोस, पं. संजू सहाय इ.

Comments