ताल
- Team TabBhiBola

- Dec 13, 2020
- 1 min read
Updated: Jan 28, 2021
ताल - संगीत शास्त्रामध्ये तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे व महत्वपूर्ण असे आहे. स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुला 'अ' हा प्रत्यय लागून 'ताल' हे शब्दरूप तयार झाले आहे. कारण गायन, वादन व नृत्य हे तालामध्ये स्थिरपणाने स्थापित असतात. गायन, वादन आणि नृत्य यांना स्थिरता प्राप्त करून देणाऱ्या, टाळी, खाली आणि बोटांच्या सहाय्याने दाखविल्या जाणाऱ्या, एका आवर्तनाच्या, खंडबद्ध काल रचनेस 'ताल' असे म्हणतात. सम, टाळी, काल, मात्रा, विभाग हे निश्चित केलेल्या मात्रांच्या समूहाच्या रचनेस 'ताल' असे म्हणतात. संगीत रचनांचे, वेळ मोजण्याचे परिमाण म्हणजे 'ताल' होय. 'ताल' म्हणजे क्रियेने मापला जाणारा काल. टाळी वाजविण्याच्या क्रियेने कालाचे मापन करतो, तो 'ताल'. संगीताच्या संदर्भात लघु, गुरू इ. प्रमाणांच्या सशब्द किंवा आघातयुक्त अथवा निःशब्द वा बिनआघाताच्या क्रियेने, गायन, वादन, नृत्य इ.च्या कालाचे मोजमाप करणारा, तो 'ताल'. प्राचीन काळात गायन होत असताना काल मोजण्याचे साधन म्हणून तालांची निर्मिती झाली. गायन, वादन व नृत्य यांची साथ करण्यासाठी तालांचा उपयोग केला जातो.

Comments