गत
- Team TabBhiBola

- Dec 13, 2020
- 2 min read
Updated: Jan 29, 2021
ड] गत - समेपूर्वी संपल्यामुळे पुनरावृत्ती करताना येणारी व त्यामुळे निसर्गातील विविध चालींचा ( movements ) प्रत्यय देणारी बंदिश म्हणजे 'गत' होय.
'गत' हे नाव 'गतीवरून' किंवा 'चालीवरून' आलेले असावे. गतीमध्ये प्रामुख्याने जड बोलांचा जास्त भरणा असतो. गतींच्या रचनांवर कत्थक नृत्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. स्वतंत्र तबला वादनात पेशकार व कायदा यांना जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व या अविस्तारक्षम रचनेस आहे. लखनौ, बनारस, फरुखाबाद आणि पंजाब घराण्यातील बुजुर्ग लोकांनी निरनिराळ्या गती स्वतःच्या कल्पनाशक्ती व बुध्दीचातुर्यावर बांधल्या व त्या आज पण तशाच वाजविल्या जातात. गतींमध्ये लयकारी, मुलायमता व वैशिष्ट्यपूर्ण सुंदर बोलांची बांधणी असून त्यात तिहाई असते. साधारणतः गतीचा शेवट व्यंजनाक्षराने होतो.
रचना सिद्धांत - गत ही स्वतंत्र तबला वादनातील एक महत्वाची रचना कृती आहे. 'गत' बांधण्यात किंवा रचण्यात रचनाकाराचे तसेच तबला वादकाचे वादन कौशल्य, लयीवरील प्रभुत्व, प्रतिभा व कल्पनाशक्ती दिसून येते. पूर्वापार रूढ होत आलेल्या पारंपरिक गती आज ऐकताना त्यांच्या रचनाकारांच्या वादनकौशल्याची व प्रतिभेची कल्पना येऊन त्यांच्या श्रेष्ठत्वाचा दर्जा दिसून येतो. गत, गत-परण अशा प्रकारच्या बंदिशी, त्यांच्या काहीशा क्लिष्ट परंतु लयबंधांच्या व वादन-सुकर नादांच्या सुयोग्य मांडणीमुळे अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या रचनाकारांची नावेही लोकप्रिय झालेली आहेत. ज्याप्रमाणे अंतऱ्याशिवाय ख्याल रचना पूर्ण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे गती, गत-परण, चक्रदार, तुकडे ह्या प्रकारांशिवाय स्वतंत्र तबला वादनही पूर्ण होऊ शकत नाही. गतींची लांबी लक्षात घेऊन, त्या योग्य जागी साथ-संगतीमध्ये वापरल्या असता, त्या साथ-संगतीलासुद्धा उठाव येतो. मोराची चाल, घारीची उत्तुंग भरारी, नागाची चाल, धबधब्याचे कड्यांवरून कोसळणे, लहान मुलांचे बागडणे अशा अनेकविध गती आपल्याला अनुभवायला मिळतात. गती किंवा चाल तिच्यात अंगभूत असलेल्या पुनरावृत्तीमुळे स्पष्ट होते. गतीच्या रचनांवर कत्थक नृत्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यामुळे तबल्याच्या सहा घराण्यांपैकी लखनौ, फरुखाबाद, बनारस व पंजाब या घराण्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा अनेक गती आहेत. दिल्ली घराण्यातील रचनाकारांनीही गती बांधल्या आहेत, परंतु त्यांची संख्या ह्या चार घराण्यांच्या तुलनेत कमी आहे.
गतींची वैशिष्ट्ये - गतीचा शेवट समेपूर्वी, साधारणतः व्यंजनाने किंवा कमी जोरकस बोलाने होतो. तरीसुद्धा काही गती, स्वराने शेवट होणाऱ्या आहेत. उदा. 'धा'ने शेवट होणारी 'फरदगत'. गतींमध्ये तिहाई असू शकते परंतु ती समेपूर्वीच संपणारी असते. चाल स्पष्ट होण्यासाठी पुनरावर्तनाची जरुरी असल्यामुळे ही रचना समेपूर्वी संपविणे आवश्यक असते. 'तालशास्त्रात' वर्णन केलेल्या सर्व यतींचा, जातींचा व ग्रहांचा गतींमध्ये समावेश केलेला असतो. गतींच्या अखेरीस काही वेळेस रेल्याच्या बोलसमूहांचा वापर देखील केला जातो.
गतींचे प्रकार खालीलप्रमाणे -
१) साधी गत २) रेला गत ३) मंझधार गत ४) तिहाई गत ५) त्रिपल्ली गत ६) दूम की गत ७) फरद गत ८) मिश्र जाती गत ९) खंड जाती गत १०) दुधारी गत ११) तिधारी गत १२) चौधारी गत १३) पंचधारीगत १४) गेंद उछाल गत १५) छंद-वृत्त गत १६) तिलयी मंजेदार गत.

गती ही संकल्पना खूप छान मांडली आहे,मला तुमचा ह्या उपक्रम खूप आवडला! फक्त गती ही 1 रचना आहे, त्यांचे प्रकार पण आहेत पण अजून विचार किंवा बारकाईने माहिती घेतली की अजून बरेच प्रकार ऐकिवात आहेत.त्यांची उदाहरण किंवा त्या रचना मिळाल्या किंवा तुम्ही जे प्रकार दाखवले आहेत त्यांची उदाहरणे सुद्धा मिळाली असती तर वाचकांच्या किंवा विद्यार्थ्यांनच्या अजून लक्षात आले असते..खूप छान आहे तब-भी-बोला ..👌 माझ्याकडून शुभेच्छा 💐💐
राकेश कुलकर्णी (खोपोली)8698435890