शेहनाई/सनई -
- Team TabBhiBola
- Dec 20, 2023
- 1 min read
Updated: Feb 21, 2024
हे एक सुषिर वाद्य असून मराठीत 'सनई' तर हिंदी भाषेत त्याला 'शेहनाई' असे म्हणतात. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ साहेबांनी या वाद्याला 'भारतरत्न' चा मुकुट चढविला. या वाद्याला 'नफिरी' वा 'सुंदरी' या नावांनीही ओळखले जाते.
'सनई' हे भारतीय 'मंगलवाद्य' आहे. छोटेसे लांबोळे, हाताळायला सुलभ असे हे वाद्य शिसम, सागवान या लाकडापासून बनविले जाते.
रचना - हे वाद्य चार भागात विभागले गेले आहे. मधला भाग पोकळ, फुगीर व सच्छिद्र असतो. तोंडाने वाजवायचा वरचा भाग मधल्या भागापेक्षा कमी रुंद, निमुळता असतो आणि तिसरा भाग जो वरच्या वरच्या भागापेक्षा मोठा असून खाली तोंडाचा आकार धोत्र्याच्या फुलासारखा असतो. वरच्या फुंकर घालून वाजविण्याचा भागात रीड्स असतात. याची लांबी साधारणतः दोन फूट असते. याचे मुख चार बोट रुंद असते. याच्या मुखात हस्तिदंताची पत्ती लावलेली असते. याच पत्तीला ओठांनी दाबून फुंकून (फुंकरून ) सनई हे वाद्य वाजविले जाते. दक्षिण भारतातही सनई सारखे एक वाद्य आहे. सनईपेक्षा थोड्या लांब असलेल्या त्या वाद्याला 'नागास्वरम्' या नावाने ओळखले जाते.
या वाद्याचा उपयोग लग्नकार्यामध्ये मंगलध्वनीची निर्मिती करण्यासाठी होतो. लोकधुनीबरोबरच शास्त्रीय संगीताचे राग वाजवून एक मधुर, मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ह्या वाद्याचा उपयोग होतो. या वाद्याच्या साथीला 'चौघडा' हे वाद्य वाजविले जाते. समारंभ, लग्नसोहळा, मुंज, देवळात, धार्मिक कार्यात तसेच आज चित्रपट संगीतातही या वाद्याचा उपयोग मोठ्याप्रमाणावर केला जातो.
फक्त लग्ना-कार्यात वाजविल्या जाणाऱ्या अशा ह्या शेहनाई/सनई वाद्याला उस्ताद बिस्मिल्लाह खाँ साहेबांनी एक मूर्त स्वरूप दिले. शास्त्रीय-संगीत ते चित्रपट संगीत अशा सर्वच संगीत प्रकारांचं सशक्त सादरीकरण आज या वाद्यावर केले जात आहे.
Recent Posts
See Allहार्मोनिअम – हार्मोनिअम हे एक सुप्रसिद्ध सुशिर वाद्य आहे. या वाद्याला मराठीत ‘संवादिनी’ असे म्हणतात. ‘हार्मोनी’ या शब्दापासून...
तानपूरा / तंबोरा – तानपूरा या वाद्याला ‘तंबोरा’ असेही म्हणतात. हे वाद्य अतिशय प्राचीन आहे. महर्षी नारद तंबरू सदैव बाळगत असत. कालांतराने...